अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या अंतर्गत येणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण होणार होते, आणि त्यासंदर्भातील घोषणा १२ फेब्रुवारी रोजी होणार होती, असा दावा शरद पवारांनी केला होता, मात्र बारामतीतील ती बैठक विलीनीकरण संदर्भात नव्हती असा दावा आता सुनील तटकरेंनी केला आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत अजित पवार अनुकूल होते, त्यासंदर्भात बारामतीत बैठक सुद्धा झाली होती, विलिनीकरणाची अधिकृत घोषणा १२ फेब्रुवारीला होणार होती, असा दावा शरद पवार यांनी केला होता. मात्र, या दाव्याचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे खंडन केले आहे.
तटकरे यांनी स्पष्ट केले की, १७ जानेवारी रोजी बारामती येथे झालेली बैठक ही पक्ष विलिनीकरणासाठी नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात आयोजित करण्यात आली होती. त्या दिवशी बारामतीत कृषी प्रदर्शन असल्यामुळे दोन्ही गटांतील काही नेते एकत्र आले होते आणि त्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली होती, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची घाई का करण्यात आली, याबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले. शरद पवार गटातील नेते जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनीदेखील त्या बैठकीत पक्ष विलिनीकरणावर चर्चा झाल्याचे सांगत पवार यांच्या भूमिकेला दुजोरा दिला आहे.
या घडामोडींचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळातील बैठकीतही उमटले. बैठकीला उपस्थित नेत्यांना माध्यम प्रतिनिधींनी याबाबत प्रश्न विचारल्याने काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या विषयावर भाष्य करण्यास टाळाटाळ करत पक्षातील भावना लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतले जातील, असे सांगितले. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्या बैठकीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.
एकूणच, दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सध्या परस्परविरोधी दावे होत असून, यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा वेग आला आहे.
