Tamil Nadu MRK Panneerselvam Row: तामिळनाडूचे कृषी मंत्री एमआरके पन्नीरसेल्वम (MRK Panneerselvam) यांनी हिंदी आणि उत्तर भारतीयांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. मंत्री म्हणाले की, उत्तर भारतातील लोक, जे फक्त हिंदी भाषा शिकतात, त्यांना येथे येऊन क्षुल्लक प्रतीचे काम करावे लागते. एमआरके यांच्या या विधानाने राजकीय वादळ निर्माण झाले आहे.

तामिळनाडू (Tamilnadu): मधील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना एमआरके पन्नीरसेल्वम (MRK Panneerselvam) म्हणाले की, उत्तर भारतातून येणारे लोक, ज्यांनी फक्त हिंदी शिकलेली असते, त्यांना तामिळनाडूमध्ये मर्यादित रोजगाराच्या संधी मिळतात आणि अनेकदा त्यांना कमी पगाराच्या नोकऱ्या स्वीकारण्यास भाग पाडले जाते. मंत्री म्हणाले की, उत्तर भारतातून येणारे लोक तामिळनाडूमध्ये टेबल साफ करणे, पाणीपुरी विकणे, बांधकाम मजूर म्हणून काम करणे यासारखी कामे करत आहेत कारण त्यांनी फक्त हिंदी भाषा शिकलेली आहे. सत्ताधारी पक्ष, एमआरके पन्नीरसेल्वम हे द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाशी संबंधित असून ते तामिळनाडूचे कृषि मंत्री आहेत.
“द्विभाषिक धोरणामुळे तामिळनाडू आणि तेथील लोकांना मदत झाली आहे. इंग्रजी भाषा लोकांना विकास करण्यास मदत करते आणि जगभरातील संधींचे दरवाजे उघडते. तामिळनाडूमध्ये मुलांना तमिळसोबत इंग्रजीही शिकवले जाते, त्यामुळे येथील मुलं परदेशात जाऊन चांगल्या नोकऱ्या मिळवतात आणि करोडो कमावतात. तथापि, हिंदी भाषिक राज्यांमध्ये, शिक्षणात इंग्रजीला प्राधान्य नसल्यामुळे लोकांना समान पातळीचा विकास साध्य करता आला नाही” असे एमआरके पन्नीरसेल्वम म्हणाले.
एमआरके पन्नीरसेल्वम यांच्या विधानानंतर, सत्ताधारी पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) ने ताबडतोब स्पष्टीकरण जारी केले. पक्षाचे प्रवक्ते डॉ. सय्यद हफीजुल्ला यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, “प्रत्येक कायदेशीर कामाची स्वतःची प्रतिष्ठा असते, आम्ही त्यांच्या त्रिभाषिक धोरणाच्या विरोधात नाही. तसेच तामिळनाडूला हिंदी भाषिक लोक आणि त्यांच्या कामाबद्दल कोणतीही समस्या नाही” असे डॉ. सय्यद हफीजुल्ला यांनी स्पष्ट केले.
नवीन शिक्षण धोरण (NEP) २०२० मध्ये तीन भाषांचे सूत्र सादर करण्यात आले होते. तामिळनाडू १९६८ पासून दोन भाषांचे धोरण (तमिळ आणि इंग्रजी) पाळत आहे. तामिळनाडू सरकार नवीन शिक्षण धोरणाला विरोध करत आहे, ज्यामुळे मार्च २०२५ मध्ये जोरदार वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारचा असा विश्वास आहे की भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तीन भाषांच्या सूत्राद्वारे हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा आरोप आहे की हा तमिळ भाषिक राज्यात हिंदी लादण्याचा प्रयत्न आहे.
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी देखील स्पष्टपणे सांगितले आहे की तामिळनाडू नेहमीच तीन भाषा धोरणाच्या विरोधात आहे. “आम्ही ते कधीही स्वीकारणार नाही,” असे ते म्हणाले. त्यांच्या मते, केंद्र सरकार हिंदीसाठी NEP चा वापर मागच्या दाराने प्रवेश म्हणून करू इच्छित आहे.
एमआरके पन्नीरसेल्वम यांच्या विधानावर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला. भाजप खासदार गिरीराज सिंह म्हणाले की, काँग्रेस तामिळनाडूमध्ये द्रमुकला पाठिंबा देते, त्यामुळे राहुल गांधींनी यावर प्रतिक्रिया द्यावी. जेडीयू खासदार संजय कुमार झा म्हणाले की, उत्तर भारतीय जिथे जातात तिथे ते अर्थव्यवस्था मजबूत करतात आणि काँग्रेसने या विधानाचे स्पष्टीकरण द्यावे. सपा खासदार अवधेश प्रसाद यांनी हे एक स्वस्त आणि नीच दर्जाचे विधान म्हटले आहे, ते म्हणाले की, अशी वक्तव्य विविधतेत एकतेचे तत्व कमकुवत करते.
या वादानंतर, पन्नीरसेल्वम यांनी गुरुवारी सकाळी एक व्हिडिओ संदेश जारी केला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “तामिळनाडूमधील द्विभाषिक धोरण पुरेसे यशस्वी झाले आहे. इंग्रजी शिकल्याने मुलांना जागतिक स्तरावर करिअरच्या मोठ्या संधी मिळतात, तर उत्तर भारतात इंग्रजीला प्राधान्य न दिल्यामुळे शैक्षणिक विकासात अडथळा निर्माण झाला आहे.”

