चीनच्या ‘युनिट्री गो-2’ (Unitree Go2) या रोबोडॉगला भारताच्या ‘गलगोटियास विद्यापीठ’ (Galgotias University) ने स्वतःचा आविष्कार म्हणून सादर केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. तीव्र प्रतिक्रियांना तोंड दिल्यानंतर विद्यापीठाची ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ मधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट‘ सुरू आहे. येथे ‘गलगोटियास विद्यापीठ‘ (Galgotias University) या भारतीय विद्यापीठाने चीनने बनविलेला ‘युनिट्री गो-2’ (Unitree Go2) हा रोबोडॉग स्वतःचे उत्पादन म्हणून सादर केल्याने मोठा वाद निर्माण झाला. चीनने यासंबंधीत ‘एक्स’ पोस्ट शेअर करत भारताची खिल्ली उडविली, तसेच नेटकऱ्यांनी सुद्धा विद्यापीठाला चांगलेच ट्रॉल केल्याने अखेर या विद्यापीठाला समिट मधून त्यांचे बूथ त्वरित रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेमका वाद काय
ग्रेटर नोएडा स्थित गलगोटियास विद्यापीठाने दिल्लीतील AI समिट मध्ये चीनच्या युनिट्री कंपनीने बनविलेला ‘गो-2’ हा रोबोडॉग स्वतः निर्माण केला असल्याचे जाहीर केले. विद्यापीठाने म्हटले की, ‘आम्ही जगातील पहिले खाजगी विद्यापीठ आहोत ज्यांनी ३५० कोटी रुपये खर्च करून हा आविष्कार केला आहे’. विद्यापीठाने या रोबोडॉगचे प्रदर्शन करत त्याचे ‘ओरियन’ (Orion) असे नामकरण केले होते. तसेच हा रोबोडॉग विद्यापीठाच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्सचे’ उत्पादन असल्याचे सुद्धा जाहीर केले.
मंगळवारी, इंडिया एआय एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी, गलगोटियास विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने, चीन मध्ये व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या या चिनी बनावटीच्या रोबोटला गलगोटियास विद्यापीठाचा नवोपक्रम म्हणून सादर केले. भारताच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयासह’ सरकारी सोशल मीडिया हँडलने सुद्धा या रोबोटचे व्हिडिओ फुटेज शेअर केले होते.
टीकेला सुरुवात कशी झाली
तथापि, काही तासांतच नेटकऱ्यांनी हा रोबोट ‘युनिट्री गो2’ असल्याचे ओळखले, जो चीनी रोबोटिक्स कंपनी युनिट्री रोबोटिक्सने बनवलेला आहे, आणि सुमारे $१,६०० मध्ये व्यावसायिकरित्या उपलब्ध आहे. काही लोकांनी असेही नोंदवले की,मूळ उत्पादकाचे ब्रँडिंग अजूनही डिव्हाइसवर दिसत होते. यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, दुसऱ्या देशाच्या उत्पादनाचे रीब्रँडिंग करून एका हाय-प्रोफाइल कार्यक्रमात राष्ट्रीय मीडिया आणि सरकारी अधिकाऱ्यांसमोर त्याचे चुकीचे प्रदर्शन केल्याचा आरोप विद्यापीठावर करण्यात आला.
चीनची टीका
चिनी सोशल मीडिया अकाउंट्सने सुद्धा ही घटना उचलून धरली, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची आणखी नामुष्की झाली. चीनच्या ‘China Pulse’ ने एक्सवर लिहिले की, ‘दिल्लीतील AI समिट मध्ये एका भारतीय विद्यापीठाने चीनच्या ‘युनिट्री गो2′ रोबोटला स्वतःचा नवीन शोध म्हणून सादर केले’. भारतीय विद्यापीठाच्या या निंदनीय कृतीमुळे चीनने भारताची खिल्ली उडविली आहे. यामुळे AI तंत्रज्ञानातील भारताच्या क्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाचक्की नंतर गलगोटियास विद्यापीठाचे स्पष्टीकरण
गलगोटियास विद्यापीठाने व्यापक टीकेला तोंड दिल्यानंतर ‘एक्स’ वर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे, त्यांनी म्हटले की, ‘आम्ही हा रोबोडॉग स्वतः बनविला असल्याचा दावा कधीही केला नाही. आम्ही हा रोबोडॉग चीनच्या ‘युनिट्री’ कंपनीकडून खरेदी केला असून, विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, प्रयोगासाठी आम्ही याचा वापर करत आहोत. विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा असा आमचा यामागील उद्देश आहे’.
विद्यापीठाच्या स्पष्टीकरणानंतर नेटकऱ्यांचे प्रश्न
- जर हा रोबोडॉग चीनचा होता तर मग या रोबोडॉगचे ‘ओरियन’ असे नामकरण का करण्यात आले?
- स्वतःचा रोबोडॉग असल्याचे मीडिया आणि सरकारला का सांगितले?
- स्वतःहून का सांगितले नाही की हा रोबोडॉग विद्यापीठाचा नसून चीनचा आहे?
- सरकारने सोशल मिडियावर या संबधित पोस्ट शेअर केल्यानंतर सुद्धा विद्यापीठाने खुलासा का केला नाही?


[…] हे सुद्धा वाचा..चीनचा रोबोट भारतीय विद्यापीठाने स्वत… […]