
अमेरिकन उद्योजक आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीचे चे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी त्यांच्या ‘गेट्स फाउंडेशन‘ संस्थेतील कर्मचाऱ्यांसमोर लैंगिक प्रकरणातील दोषी गुन्हेगार जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) याच्याशी असलेल्या संबंधांबद्दल माफी मागितली आहे. तसेच रशियन महिलांशी संबंध असल्याचे देखील कबूल केले आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ च्या विशेष अहवालात गेट्स यांनी ही कबुली दिली आहे.
रशियन महिलांसोबत संबंधांची कबुली
टाउन हॉलमध्ये बोलतांना गेट्स यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दोन रशियन महिलांसोबत संबंध असल्याची कबुली दिली. “एक रशियन ब्रिज खेळाडूसोबत, जी मला ब्रिज स्पर्धांमध्ये भेटली, आणि दुसरी एक रशियन अणुभौतिकशास्त्रज्ञ, जीच्याशी व्यवसायाच्या माध्यमातून भेट झाली होती,” असे त्यांनी सांगितले. मात्र या प्रकरणांचा एपस्टाईनच्या पीडितांशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
न्यूयार्क पोस्टच्या वृत्तानुसार, एपस्टीनने पूर्वी काही ईमेलमध्ये गेट्स यांच्या कथित संबंधांचा उल्लेख केला होता. जुलै 2013 मधील एका ईमेलमध्ये गेट्सचे माजी सल्लागार ‘बोरिस निकोलिक’ यांचा उल्लेख करण्यात आला होता, मात्र निकोलिक यांनी अशा ईमेलशी आपला संबंध नाकारला आहे.
एपस्टीनला शिक्षा झाल्यानंतरही भेटी सुरू होत्या
जर्नलच्या अहवालानुसार, एपस्टीनला 2008 मध्ये अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतरही गेट्स यांनी 2011 मध्ये पहिल्यांदा त्यांची भेट घेतली आणि 2014 पर्यंत संपर्क ठेवला.
गेट्स यांनी कबूल केले की, एपस्टीनला 18 महिन्यांचा तुरुंगवास झाल्याची माहिती त्यांना होती, मात्र त्यांनी एपस्टीनची पार्श्वभूमी योग्यरित्या तपासली नाही. 2013 मध्ये गेट्सच्या तत्कालीन पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स (Melinda French Gates) यांनी नेहमीच एपस्टीनबाबत संशय आणि चिंता व्यक्त केली होती, असे गेट्स यांनी सांगितले.
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गेट्स यांनी एपस्टीनसोबत खाजगी जेटने प्रवास केला. जर्मनी, फ्रान्स, न्यू यॉर्क व वॉशिंग्टन येथे वेळ घालवला. मात्र, “मी कधीही रात्रभर थांबलो नाही किंवा त्याच्या खाजगी बेटाला भेट दिली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेतील मीडिया रिपोर्ट नुसार, फेडरल सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपांनंतर, ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात एपस्टीनने आत्महत्या केली.
अमेरिकेच्या डीओजे फाइल्सनंतर वाद पुन्हा उफाळला
गेल्या महिन्यात अमेरिकेच्या ‘युनायटेड स्टेट्स न्याय विभागाने’ (United States Department of Justice, DOJ) हजारो कागदपत्रे प्रसिद्ध केली, ज्यांना “एपस्टीन फाइल्स” म्हटले जाते. या कागदपत्रांमध्ये ईमेल, मुलाखतींचे ट्रान्सक्रिप्ट, छायाचित्रे यांचा समावेश आहे, जे एपस्टीन आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्तींमधील संबंध दर्शविते.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एपस्टीनच्या तुरुंगवासानंतरही गेट्स आणि एपस्टीन विविध उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी वारंवार भेटले होते.
या महिन्याच्या सुरुवातीला गेट्स फाउंडेशनने स्पष्ट केले की त्यांनी एपस्टीनला कोणतेही आर्थिक अनुदान दिले नाही किंवा त्याला कधीही नोकरी दिली नाही.
गेट्स यांनी मान्य केले की एपस्टीनशी असलेल्या संबंधांमुळे फाउंडेशनच्या मूल्यांना धक्का बसला. “हे निश्चितच फाउंडेशनच्या मूल्यांच्या आणि उद्दिष्टांच्या विरोधात आहे. आमचे काम प्रतिष्ठेवर अवलंबून आहे, आणि लोक आमच्यासोबत काम करायचे की नाही हे निवडू शकतात,” असे ते म्हणाले.
2000 मध्ये गेट्स आणि त्यांच्या तत्कालीन पत्नीने स्थापन केलेले गेट्स फाउंडेशन हे जागतिक आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठ्या निधी देणाऱ्या संस्थांपैकी एक आहे.
“मी काहीही बेकायदेशीर केले नाही”
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या विशेष अहवालानुसार, टाउन हॉल दरम्यान गेट्स यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले, “मी काहीही बेकायदेशीर केले नाही. तसेच मी काहीही बेकायदेशीर पाहिले नाही.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “स्पष्ट सांगायचे तर, मी कधीही पीडितांसोबत किंवा त्यांच्या सभोवतालच्या महिलांसोबत वेळ घालवला नाही. मी केलेल्या चुकीमुळे यात ओढले गेलेल्या इतर लोकांची मी माफी मागतो.”
अहवालानुसार, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “एपस्टीन फाइल्स” मधील काही छायाचित्रांमध्ये महिलांचे चेहरे झाकलेले दिसतात. यावर गेट्स यांनी सांगितले की, “बैठकीनंतर एपस्टीनने त्यांना सहाय्यकांसोबत फोटो काढण्यास सांगितले होते.”
गेट्स फाउंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेट्स यांनी प्रामाणिकपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि आपल्या कृतींची जबाबदारी स्वीकारली आहे.
हे सुद्धा वाचा > ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार


[…] हे सुद्धा वाचा: मोठी चूक झाली, रशियन महिलांशी संबंध हो… […]
[…] हे सुद्धा वाचा: मोठी चूक झाली, रशियन महिलांशी संबंध हो… […]