
तामिळनाडू: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार व ‘तमिलगा वेत्री कळघम‘ (TVK) पक्षाचे प्रमुख ‘थलपती विजय’ (Thalapathy Vijay) यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पत्नी संगीता सोरणालिंगम (Sangeeta Sornalingam) यांनी तब्बल २५ वर्षांहून अधिक काळाच्या वैवाहिक सहजीवनानंतर घटस्फोटासाठी (divorce) तामिळनाडू येथील न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून, चित्रपटसृष्टीत चर्चेला उधाण आले आहे.
१९९९ मध्ये झाले होते लग्न
ऑगस्ट १९९९ मध्ये विजय आणि संगीता यांचा विवाह झाला होता. या दाम्पत्याला जेसन संजय आणि दिव्या शाशा अशी दोन मुले आहेत. अनेक वर्षे हे जोडपे सार्वजनिक आयुष्यात आदर्श कुटुंब म्हणून पाहिले जात होते. मात्र, अलीकडील घडामोडींमुळे त्यांच्या नात्यात गंभीर दुरावा निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
विशेष विवाह कायदा, १९५४ अंतर्गत याचिका
संगीताने दाखल केलेली घटस्फोटाची याचिका Special Marriage Act, १९५४ च्या तरतुदींवर आधारित आहे. विशेषतः कलम २७(१)(अ) आणि २७(१)(ड) अंतर्गत व्यभिचार (Adultery) आणि क्रूरता (Cruelty) या कारणांचा आधार घेत हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. कायद्यानुसार, जर पती किंवा पत्नीने विवाहबाह्य संबंध ठेवले असल्याचे सिद्ध झाले किंवा जोडीदाराने मानसिक अथवा शारीरिक क्रूरता केली असल्याचे आढळले, तर संबंधित पक्षाला घटस्फोट मागण्याचा अधिकार आहे.
विवाहबाह्य संबंधाचा आरोप
याचिकेनुसार, संगीता यांनी आरोप केला आहे की विजय एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंधात सहभागी होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२१ मध्ये त्यांना या कथित संबंधाची माहिती मिळाली.
याचिकेत नमूद करण्यात आले आहे की:
“याचिकाकर्त्याला २०२१ मध्ये कळले की प्रतिवादी एका अभिनेत्रीसोबत व्यभिचार संबंधात सहभागी होता. ”
या घटनेनंतर त्यांनी कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचिकेत पुढे असा उल्लेख आहे की विजय यांनी संबंधित नातेसंबंध संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, संगीता यांच्या मते ते आश्वासन पूर्ण झाले नाही. या मुद्द्यांवर आधारितच व्यभिचार आणि क्रूरता या दोन्ही कारणांचा उल्लेख करून संगीताकडून घटस्फोटाची मागणी करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा> बॉलीवूडचा धुरंधर रणवीर सिंहच्या जीवाला धोका; घराजवळील सुरक्षा वाढविली
प्रकरण न्यायालयात प्रलंबित
सदर प्रकरण सध्या जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून अद्याप अंतिम निर्णय लागलेला नाही. दोन्ही पक्षांकडून पुढील सुनावण्यांमध्ये पुरावे आणि युक्तिवाद मांडले जाण्याची शक्यता आहे.
या घडामोडींवर विजय किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. दरम्यान, चाहत्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये या प्रकरणाची व्यापक चर्चा सुरू आहे. न्यायालयाचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा > दुसरा स्वातंत्र्यलढा सुरू, साम्राज्यवादी शक्ती परतत आहेत: कमल हासन

