टिपू सुलतानवरील वरील वादात कॉंग्रेस, भाजपा नंतर AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेत भाजपावर थेट हल्ला चढवला आहे.

नाशिक: मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर ‘शान ए हिंद निहाल अहमद’ यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मोठा वाद निर्माण झाला. हा वाद आता राज्यभर पसरला असून त्याला गंभीर वळण लागले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष मानले पाहिजे, असे विधान केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधारी भाजपने या विधानाचा तीव्र निषेध केला असून काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. अश्यातच या वादात आता ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) पक्षाचे खासदार ‘असदुद्दीन ओवेसी‘ यांनी उडी घेत भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे.
असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले
“टिपू सुलतानने तुरुंगात बसून तुमच्या वीर सावरकरांसारखं इंग्रजांना लव्हलेटर लिहिली नाहीत. ते इंग्रजांशी लढताना शहीद झाले. टिपू सुलतानने तलवार उचलली आणि इंग्रजांपासून आपला देश स्वतंत्र करण्यासाठी लढाया केल्या आणि त्यातच ते शहीद झाले. इंग्रजांना टीपू सुलतानची एवढी भीती होती की दीड तास त्याचा मृतदेह रणांगणात पडून होता. इंग्रजांची फौज आजूबाजूला होती, पण तरीही त्याच्या मृतदेहाजवळ कोणीही जात नव्हतं. कारण त्यांना देखील भीती होती की अचानक उठला तर काय?”,असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.
असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की, “टिपू सुलतानकडे जी सोन्याची अंगठी होती, त्या अंगठीवर ‘राम’ लिहिलेलं होतं. २०१४ मध्ये त्या अंगठीचा लिलाव देखील झाला. ही गोष्ट खोटी आहे का? डॉ. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’ या पुस्तकात लिहिलंय की, ‘रॉकेट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण टिपू सुलतानच्या स्वप्नांना पूर्ण करत आहोत’. तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी देखील डॉ. अब्दुल कलाम आदर्श आहेत. मग त्यांचं तरी ऐकलं पाहिजे”.
“महात्मा गांधींनी सुद्धा एका मासिकात लिहिलंय की टिपू सुल्तान हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक होते. तुम्ही महात्मा गांधींना मानता ना? मग तुम्ही आता महात्मा गांधींना खोटं ठरवणार आहात का?. टिपू सुलतान एक बादशहा होता, त्याच्या फौजेचे सेनापती अप्पाजी राम होते, तर सल्लागार कृष्णा राव होते. मग आता हे देखील खोटं आहे का?. भाजपा मात्र केवळ द्वेष पसरवत आहे”. असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले
कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आदर्श घेऊनच टिपू सुलतान याने इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. टिपू सुलतान भारताचे भूमिपुत्र होते आणि त्याने विखारी विचारांना कधीही थारा दिला नाही. शौर्याचे लक्षण म्हणून टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळांच्या विधानाचा समाचार घेत अत्यंत कडक शब्दांत टीका केली, ते म्हणाले, “व्होट बँकेच्या लालसेपोटी काँग्रेस किती खालच्या थराला जाणार? स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवरायांची तुलना हजारो हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानशी करणे निंदनीय आहे. महाराष्ट्राची जनता हे कधीही सहन करणार नाही”.

[…] […]
[…] […]