Untitled design 17
मदुराईतील गांधी स्मारक संग्रहालयात भाषण करताना कमल हासन
मदुराई येथील गांधी स्मारक संग्रहालयातील ‘रिमेंबरिंग बापू’ कार्यक्रमात बोलताना कमल हासन

तामिळनाडू: Makkal Needhi Maiam (एमएनएम) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांनी शनिवारी मदुराई येथे आयोजित कार्यक्रमात “दुसऱ्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याची (second Indian freedom struggle) सुरुवात झाली आहे” असा ठाम दावा केला. राज्याच्या प्रश्नांसाठी आवाज उठवताना आपण राजकीय भूमिका बाजूला ठेवून केवळ प्रेम आणि आपुलकीच्या भावनेतून येथे आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

गांधी स्मारक संग्रहालय (Gandhi Memorial Museum) येथे पार पडलेल्या ‘रिमेंबरिंग बापू’ या कार्यक्रमात बोलताना हासन यांनी सांगितले की, साम्राज्यवादी शक्तींविरोधातील लढ्यात ते महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना आदर्श मानतात.

“आजही साम्राज्यवादी शक्ती भारताकडे परत येत आहेत. याबाबत कोणतीही शंका बाळगू नका, दुसरा भारतीय स्वातंत्र्यलढा आधीच सुरू झाला आहे, असे समजा. जागृतीचा हा आवाज इथून उठला नाही, तर मग कुठून उठणार? तुम्ही त्याला मदुराई म्हणा, मंगम्मल पॅलेस म्हणा किंवा गांधी मंडपम. हा आपल्या भूमीचा आवाज आहे. आणि तो प्रभावीपणे ऐकू यावा म्हणून मी माझे पक्षीय झेंडे बाजूला ठेवून, केवळ प्रेम आणि आपुलकी घेऊन येथे आलो आहे,” असे हासन यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांच्याशी लोकांनी मतभेद व्यक्त करणे हे चुकीचे नसून लोकशाहीतील एक आवश्यक कर्तव्य आहे. गांधींच्या निधनानंतर पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांनी ‘विदुथलाई’ मध्ये लिहिलेल्या संपादकीयाचा उल्लेख करत हासन यांनी सांगितले की, त्या लेखाचा त्यांच्या बालमनावर खोल प्रभाव पडला होता.

“मी लहान असताना इतिहास आणि जुन्या कथा वाचायला सुरुवात केली. त्यावेळी गांधीजींच्या मृत्यूनंतर पेरियारांनी लिहिलेले संपादकीय वाचून मला प्रचंड आश्चर्य वाटले. ‘ते इतके महान व्यक्ती होते का?’ असा प्रश्न माझ्या मनात आला. आणि हो, ते खरोखरच महान होते,” असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, पेरियार यांची विचारसरणी गांधींच्या चळवळीतूनच उदयास आली, मात्र ती मतभेदांच्या प्रक्रियेतून विकसित झाली. “गांधींशी असहमत असणे हे ना पाप आहे, ना शौर्य. असहमती व्यक्त करणे हे प्रत्येक पिढीचे कर्तव्य असते. जर एखाद्या पिढीने तर्काने संवाद साधला नाही, तर मतभेद रागात परिवर्तित होतात,” असे हासन यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा > ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार.

हासन पुढे म्हणाले की, ते मार्गदर्शनासाठी आणि साम्राज्यवाद्यांविरुद्ध उभे राहून बोलण्यासाठी डॉ. बी.आर. आंबेडकर आणि पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांच्याकडे पाहतात, आणि ते महात्मा गांधींना आदर्श मानतात.

महात्मा गांधी यांनी दिलेल्या खादी चळवळीच्या संदेशाचा संदर्भ देत कमल हासन यांनी आपल्या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘कमल हासन हाऊस ऑफ खादी’ या त्यांच्या कंपनीमार्फत खादी उत्पादनाला चालना देण्याचे काम सुरू आहे.

“मी चालवत असलेली कंपनी ‘कमल हासन हाऊस ऑफ खादी’ या नावाने कार्यरत आहे. या ठिकाणी तयार होणारे कापड हे खादीच्या परंपरेला पुढे नेणारे आहे. गांधीजी शेवटच्या काळात जेव्हा येथे आले होते, तेव्हा त्यांनी खासकरून मदुराईत खादी उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले होते. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की, ‘महात्माजी, आपण सुरू केलेले कार्य पुढे चालू आहे.”असे हासन यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा > टिपू सुलतानने सावरकरांसारखी इंग्रजांना ‘लव्हलेटर’ लिहिली नाहीत, त्यांच्या अंगठीत…

One thought on “दुसरा स्वातंत्र्यलढा सुरू, साम्राज्यवादी शक्ती परतत आहेत: कमल हासन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *