944973 bjp dimle mehta mira bhayander municipal corporation

Mira Bhayandar Mayor: मीरा-भाईंदरच्या महापौरपदी मराठी व्यक्तीची निवड व्हावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली होती; मात्र भाजपने ही मागणी न मानता अमराठी डिंपल मेहता यांना उमेदवारी देऊन महापौरपदी निवडून आणले.

944973 bjp dimle mehta mira bhayander municipal corporation
Protests erupt in Mira-Bhayander after Dimple Mehta’s election as Mayor. (Image Source – edited by Lokfeeder Team)

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता यांची निवड झाली असून, निवडणुकीत त्यांना ७९ मते मिळाली. महापौरपदी मराठी व्यक्तीलाच संधी द्यावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करत भाजपने अमराठी डिंपल मेहता यांना उमेदवारी देऊन विजय मिळवून दिला. दरम्यान, या निर्णयाविरोधात मराठी एकीकरण समितीने आंदोलन छेडले असून आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही ठिकाणी झटापटही झाल्याची माहिती आहे.

महापौर निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला, तरी या निवडीमुळे शहरात भाषिक वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. डिंपल मेहता यांनी ७९ मते मिळवत महापौरपद पटकावले, मात्र ‘मराठी राज्यात अमराठी महापौर’ नेमल्याचा आरोप करत मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठी माणूस काय भूमिका घेणार;

डिंपल मेहता यांच्या निवडीची घोषणा होताच मराठीप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते सुभाषचंद्र बोस मैदानाबाहेर जमले आणि जोरदार निदर्शने सुरू केली. “मराठी महापौर हा आमचा अधिकार” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान, आंदोलकांनी महापौरांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणत काही आंदोलकांना ताब्यात घेतले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण झाली;

मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “हा मराठी माणसाचा राज्य असून येथे मराठी अस्मिता जपली गेली पाहिजे. १०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेल्या महाराष्ट्रात मराठी जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष करून अमराठी महापौर नेमला जात आहे. मुंबई गुजरातमध्ये जाऊ नये म्हणून आमच्या पूर्वजांनी संघर्ष केला, आणि आज पुन्हा त्याच लढ्याची वेळ आल्याची भावना निर्माण होत आहे.”

राजकीय वातावरण संतप्त;

मीरा-भाईंदरमध्ये अमराठी मतदारांची संख्या लक्षणीय असली, तरी स्थानिक मराठी संघटनांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपपुढे नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. मनसेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने महापालिका मुख्यालयासह परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *