नाशिक येथील नियोजित कुंभमेळयात श्रमदान करून प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त दोन श्रेयांक (Credits) देण्याची घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केली आहे.

पुणे: नाशिक येथे लवकरच होणाऱ्या कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) पार्श्वभूमीवर ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने’ (SPPU) एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कुंभमेळ्यात स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतल्यास त्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात दोन अतिरिक्त श्रेयांक (Credits) देण्यात येणार असल्याची घोषणा विद्यापीठ प्रशासनाने केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक अनुभव मिळण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीलाही मदत होणार आहे, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.
कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक मेळ्यांपैकी एक मानला जातो. लाखो भाविक देशभरातून आणि परदेशातून नाशिकमध्ये दाखल होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दीचे व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य सेवा, माहिती पुरवणे, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे ही प्रशासनासाठी मोठी जबाबदारी असते. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत उपयुक्त ठरतो. तरुण स्वयंसेवक मार्गदर्शन, जनजागृती, शिस्त राखणे आणि विविध सेवांमध्ये प्रशासनाला मदत करू शकतात. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हा श्रेयांकाचा निर्णय घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कुंभमेळ्यात स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतल्यास त्यांना दोन अतिरिक्त श्रेयांक देण्याचा ठराव पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी मांडला होता. या ठरावाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर, तसेच व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेने मान्यता दिली आहे.
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य म्हणाले की, ‘कुंभमेळ्यात यापूर्वीही विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून विविध क्षेत्रांत योगदान दिले आहे. आता या योगदानाची अधिकृत नोंद होऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक श्रेयांक मिळणार आहेत, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, संशोधन आणि नियोजनाच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. तसेच प्रशासनाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम एक अनोखा शैक्षणिक प्रयोग ठरणार आहे.’
‘आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस आणि इतर यंत्रणांना सहाय्य करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात कुंभमेळा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांमध्ये बैठका पार पडल्या असून, विद्या परिषदेतही याला मान्यता देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. आता प्राचार्यांची बैठक घेऊन स्वरूप अंतिम करण्याच्या सूचना अधिष्ठात्यांना देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिली.
‘ओपन इलेक्टिव्ह क्रेडिट’ पद्धतीअंतर्गत विद्यार्थ्यांना दोन श्रेयांक देण्याची तरतूद आहे. कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक आणि सामाजिक सोहळ्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार विविध कामांमध्ये सहभागी होता येणार आहे. दोन श्रेयांक मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ६० तास प्रत्यक्ष काम करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतरच संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व श्रेयांक दिले जाणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, नियोजन आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असून प्रशासनालाही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिली.

Ohh..