तेलंगणात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर गंभीर आरोप करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

तेलंगणा (Telangana) : राज्यातील सांगरेड्डी जिल्ह्यातीलतेल्लापूर गावात महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विविध नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर गंभीर आरोप करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. त्यांच्या मते, हा हल्ला केवळ महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर नसून सामाजिक न्यायाच्या चळवळीवर झालेला हल्ला आहे.
घटनेचा तपशील काय?
स्थानिक माहितीनुसार, सांगरेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात उभारलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याची काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या उपस्थितीत ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरात पोलिसांचा अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून संबंधित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकरांचा संताप
या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी RSS वर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, “आरएसएसला महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी द्वेष आहे. वंचित आणि बहुजनांच्या समतेच्या आंदोलनाला चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. आरएसएसला दलित, आदिवासी आणि ओबीसींबद्दल आकस आहे, त्यांना केवळ मनुवाद आणि ब्राह्मणवादाचेच प्रेम आहे.”
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना सवाल
प्रकाश आंबेडकर यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनाही प्रश्न विचारले आहेत. त्यांच्या मते, राज्यात वारंवार महापुरुषांच्या पुतळ्यांवर हल्ल्याच्या घटना घडत असून सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. “सरकार या गुंडांवर कठोर कारवाई का करत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच हा देश केवळ आणि केवळ फुले, शाहू आणि आंबेडकरवादी विचारधारेवरच चालेल, मनुवादाने नाही, असा सज्जड दमही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
चंद्रशेखर आझाद (रावण) यांची प्रतिक्रिया:
भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष व खासदार चंद्रशेखर आझाद यांनी तेलंगणातील सांगरेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना आझाद म्हणाले की, “महात्मा फुले यांच्यावर झालेला हा हल्ला सामाजिक न्याय, शिक्षण आणि बहुजन चळवळीच्या मूल्यांवर हल्ला आहे. अशा प्रकारच्या घटना समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, “देशातील बहुजन महापुरुषांच्या विचारांना लक्ष्य करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही आणि अशा घटनांविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल”, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांची प्रतिक्रिया
दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी भाजपवर टीका करत म्हटले की, तेलंगणातील या घटनेत काही भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे आरोप समोर येत आहेत आणि ही बाब गंभीर आहे. सावंत म्हणाले की, महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आणि समाजाला दिशा दिली. त्यामुळे शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांना वेगळे करून पाहता येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांचा वापर करणाऱ्यांनी समाजात फूट पाडण्याचे काम करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

